जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
चाळीसगाव, कमी शिकल्याचा फायदा घेत विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १५ लाख ८५ हजार रुपयांची थार गाडी लाटल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
फिर्यादी भिकन देवराम पाटील (रा. वाघडू, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विशाल चौधरी (रा. टाकळी प्र.चा.), भूषण चौधरी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी संगनमत करून कट रचला.
भिकन पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या जोरावर आरोपींनी पाटील यांच्या नावावर १५,८५,००० रुपयांचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले.
धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीला कोणत्याही शोरूममध्ये न नेता परस्पर त्यांच्या नावावर MH 52 B 7377 क्रमांकाची थार गाडीची नोंदणी करण्यात आली आणि गाडी कुठेतरी लपवून ठेवण्यात आली.
हा सर्व प्रकार डिसेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडला असून, यात नाशिक येथील अशोक स्तंभाजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचाही संबंध असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भिकन पाटील यांनी थेट चाळीसगाव शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.
अशाच प्रकारे अडाणी लोकांची फसवणूक करणारी टोळी परिसरात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
