नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग आणि गौण खनिज विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जमीन महसूल व गौण खनिज वसुली, प्रलंबित फेरफार नोंदी, खरीप हंगाम सर्वेक्षण, ॲग्रीस्टॅक योजना आणि अवैध उत्खनन व वाहतूक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :
📊 वसुली उद्दिष्टानुसार : जिल्ह्यात जमीन महसूल आणि गौण खनिज वसुली उद्दिष्टानुसार सुरू असून, यात आणखी वाढ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
📑 १,७४८ फेरफार प्रलंबित : जिल्ह्यात सध्या १,७४८ फेरफार नोंदी प्रलंबित असून त्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
🌾 खरीप सर्वेक्षण ८४.४०% पूर्ण : खरीप हंगामातील ८४.४० टक्के भूखंडांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
🛰️ ॲग्रीस्टॅकमध्ये ८८.६७% नोंदणी : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८.६७ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शत-प्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश आहेत.
तसेच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, प्रलंबित दंडवसुली करणे, जमीन विक्री परवानगीची प्रकरणे आणि गौण खनिज विषयक तक्रारींचे नियमानुसार निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि त्याचा अद्ययावत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले.
या आढावा बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
