नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत.

मुंबई – एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.

“प्रवाशांकडून २ रुपये घेतो, मग स्वच्छता हवीच!”

मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले, “सर्वसामान्य प्रवाशांकडून आपण दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारतो. प्रवासीही ही रक्कम देण्यास हरकत घेत नाहीत. मात्र, त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेची सुविधा मिळणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या या रास्त अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा थेट परिणाम एसटीच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई होता कामा नये.”

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने जागरूक राहावे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारानुसार योग्य प्रकारे स्वच्छता करून घ्यावी.

केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

“प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात आपण कमी पडलो, तर त्याची जबाबदारी संबंधित विभाग नियंत्रकांवर निश्चित केली जाईल,” असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुसह्य प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलता दाखवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत मांडली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!