जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.:

शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनी आणि माता-पालकांसाठी एक आगळा-वेगळा आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समिती आणि माता-पालक प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किशोरी संवाद’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन आज गुरुवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृहात मोठ्या उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिवा सौ. मीराताई गाडगीळ होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. विजयालक्ष्मी परांजपे उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे आणि श्री. जगदीश साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने माता-पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.

गोडबोले मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शाळेच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका व समुपदेशक सौ. भारती गोडबोले यांनी किशोरवयीन मुलींशी अत्यंत संवेदनशील संवाद साधला. त्यांनी किशोरवयातील शारीरिक व भावनिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षितता व स्वसंरक्षण या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

“किशोरवयात मुलींच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे ही आजच्या काळात माता-पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन गोडबोले मॅडम यांनी यावेळी केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित माता आणि मुलींमध्ये एक नवीन विश्वासाचा सेतू निर्माण झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता तडवी यांनी केले, तर प्रास्ताविक सौ. सुवर्णा वंजारी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभारप्रदर्शन सौ. मंगला भारुडे यांनी केले.

‘मुलींना समजून घेऊया’ हा संदेश

‘मुलींना समजून घेऊया, त्यांच्या भावविश्वाशी जोडले जाऊया’ या ब्रीदवाक्याला अनुसरून झालेल्या या कार्यक्रमातून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि माता-पालक व मुलींमधील संवाद अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात सौ. मीराताई गाडगीळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करून माता-पालकांनी मुलींशी सुयोग्य संवाद साधून त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती योगिता महाजन, सौ. नीलिमा सपकाळे, सौ. वृषाली पाटील, श्री. हिम्मत काळे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!