नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
नंदुरबार: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ प्रकारचा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा आणि राज्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यास तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे.
यंदा पावसाने मोठी पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. सातपुड्यातील प्रमुख आणि बारमाही वाहणारी मानली जाणारी उदय नदीसुद्धा ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडल्याचे विदारक चित्र आहे. पाण्याअभावी पिके करपली असून आता जनावरांसमोर चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना चाऱ्याचा काळाबाजार आणि परजिल्ह्यात तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठी उपाययोजना हाती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 25,524 ग्रामीण रोजगार प्रकल्प सुरू करण्यात आले असून, या कामांमधून तब्बल 101 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून मजुरांना गावातच काम मिळेल आणि स्थलांतर थांबेल.
एकूणच, नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून पुढील काही महिने प्रशासन आणि शेतकऱ्यांसाठी कसोटीचे ठरणार आहेत.
