नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय भांगरापाणी आश्रमशाळेत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या जेवणात मृत पाल आढळल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 20 ऑक्टोबर रोजी घडला आहे. सेंट्रल किचनमधून पुरवठा होणाऱ्या जेवणात विद्यार्थ्यांना मृत पाल दिसली. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले. या घटनेचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाभरातून आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी असा उघडपणे खेळ सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

पुरवठादारावर कठोर कारवाईची मागणी

या घटनेनंतर संबंधित सेंट्रल किचनचा पुरवठादार आणि आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट आणि अस्वच्छ जेवण पुरवले जात असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी आदिवासी विकास विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!