नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नंदुरबार जिल्ह्यातील खतांच्या काळाबाजाराला आणि चढ्या भावाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आजपासून, 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर्स सेल’ ही नवी डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत तासन्-तास उभे राहावे लागणार नाही.

काय आहे नवी प्रणाली?

शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून खताचे ॲडव्हान्स बुकिंग करता येणार आहे.

मोबाईल ॲपवर आधार कार्ड नंबर आणि शेताचा सर्व्हे नंबर टाकल्यानंतर एक QR कोड जनरेट होईल. हा QR कोड दाखवून अधिकृत खत विक्री केंद्रातून शेतकऱ्यांना सहज खत उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा?

1. पारदर्शकता: कोणाला किती खत दिले याची संपूर्ण माहिती ऑनलाईन राहणार.

2. काळाबाजाराला आळा: बोगस खरेदी आणि साठेबाजीला ब्रेक लागणार.

3. जादा दरवसुली बंद: दुकानदारांना ठराविक दरापेक्षा जास्त पैसे घेता येणार नाहीत.

या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले की, “जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. डिजिटल बुकिंगमुळे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचेल आणि काळाबाजार पूर्णपणे बंद होईल.”

रब्बी हंगामाच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!