धुळे: गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील पिके माना टाकू लागली असून पांजरा नदीसह जिल्ह्यातील बहुतांश नद्या-नाले कोरडेठाक पडले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या –
1. धुळे जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. 2. शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी आर्थिक मदत थेट खात्यात जमा करावी. 3. पिकांचे पंचनामे तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावेत.
यावेळी बोलताना आंदोलकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. “प्रशासनाकडून 70 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर कोणीही फिरकले नाही आणि एक रुपयाचीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. केवळ कागदावर पंचनामे दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे,” असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.
दिवाळी तोंडावर आली असताना शेतकऱ्याच्या हातात पीक नाही आणि खिशात पैसा नाही, अशी विदारक स्थिती आहे. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून मदत न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
