बैलावर हल्ला, शेतकरी धास्तावले; पिंजरा लावा, अन्यथा रास्ता रोको – ग्रामस्थ आक्रमक
चोपडा (जळगाव) – चोपडा तालुक्यातील घाडवेल गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाडवेल शिवारात एका शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी शेतातून घरी परतताना, तसेच सकाळी शेतात जाण्यासाठीही शेतकरी आता घाबरत आहेत. शेतमजुरांनी शेतात जाण्यास नकार दिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून परिसरात पिंजरा लावण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
“घाडवेल परिसर जंगलालगत असल्याने बिबट्या मानवी वस्तीत शिरत आहे. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे,” अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या संदर्भात वनविभागाचे अधिकारी लवकरच घटनास्थळाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
