पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता बोगस वाटपाला बसणार आळा

जळगाव/चोपडा प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. खतांच्या खरेदी-विक्रीत होणारा काळाबाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र शासनाने आणलेली नवी प्रणाली आजपासून जळगाव जिल्ह्यात लागू झाली आहे.

केंद्र शासनाची ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) ही अत्याधुनिक प्रणाली आज, बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2026 पासून जळगाव जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीची सुरुवात चोपडा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवरून करण्यात आली आहे.

काय आहे नवा बदल?

यापुढे चोपडा तालुक्यातील कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर खताचे वाटप हे FFS प्रणालीद्वारेच केले जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे खत खरेदी-विक्री प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि 100% पारदर्शक होणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार?

१. खतांच्या वाटपात पारदर्शकता येईल.

२. बोगस आधार कार्डवर खत घेणाऱ्यांना चाप बसेल.

३. गरजू आणि पात्र शेतकऱ्यालाच शासकीय अनुदानित खत मिळणे सुलभ होईल.

४. खतांचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा बसेल.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ही प्रणाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात लागू केली जाणार असून, त्याची सुरुवात चोपडा तालुक्यापासून झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!