जळगाव प्रतिनिधी
जळगावात दुष्काळाच्या झळा आता सुवर्ण बाजारपेठेलाही बसल्या असून दसरा सणानंतरही जळगावच्या सराफ बाजारात अपेक्षित गर्दी दिसली नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे.
दसरा आणि नवरात्र हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. दरवर्षी या काळात सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा चित्र अगदी उलट आहे.
ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरानेही उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदीपासून दूर राहत आहे.
दसरा संपून दोन दिवस उलटले तरी बाजारात शुकशुकाटच आहे. ग्राहक केवळ दर विचारून जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ऐन सणासुदीच्या काळात बाजाराची ही अवस्था असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दिवाळीपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.
