जळगाव प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जळगावकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जंक्शन स्थानकातून थेट नवी दिल्लीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन रेल्वेने ही विशेष गाडी जाहीर केली आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य –
या विशेष रेल्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी शयनयान (Sleeper) आणि जनरल श्रेणीचे एकूण 7 अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना थेट दिल्ली गाठणे सोपे होणार आहे.
या निर्णयामुळे जळगाव, भुसावळ, चाळीसगावसह खान्देशातील हजारो प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच या गाडीचे वेळापत्रक आणि तारीख जाहीर केली जाणार आहे.
दिवाळीत गावी येणाऱ्या आणि दिल्ली-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष रेल्वे वरदान ठरणार आहे.
