जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यावर यंदा पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) च्या सप्टेंबर 2026 च्या अहवालाने जिल्हावासियांची चिंता वाढवली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या तुलनेत तब्बल 1.40 मीटरने खालावली आहे.
GSDA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी आणि यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील पातळी यांची तुलना केली असता ही मोठी तफावत समोर आली आहे.
या भूजल पातळीतील घसरणीचा थेट फटका आगामी रब्बी हंगामाला बसण्याची शक्यता आहे. विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत घट झाल्याने शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागली आहे.
जर लवकर उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असून जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
