जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवानांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे आयोजित या भावपूर्ण कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. आर. एन. जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. महापौर, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला शहीद जवानांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. त्यानंतर शहीदांच्या नावांचे वाचन करून त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि त्यागाला सलामी देण्यात आली. कर्तव्यनिष्ठा हेच खरे देशप्रेम असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

देशभरात २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. १९५९ साली लडाखमधील हॉट स्प्रिंग येथे चिनी सैन्याशी लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या १० जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्याच परंपरेनुसार जळगाव पोलिसांनी आज आपल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी शहीदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!