चोपडा तालुका प्रतिनिधी, अजय परदेशी.

चोपडा, दि. १९ – कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खाकी वर्दीमागेही एक संवेदनशील मन असते, याचा प्रत्यय चोपडा पोलिसांनी पुन्हा एकदा घडवून दिला आहे. खान्देशची जीवनदायिनी असलेल्या तापी नदीच्या पात्रात उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करून चोपडा शहर पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

चोपडा तालुक्यातील सावखेडा शिवारात तापी नदी वाहते. नदीचे पाणी कमी झाल्याने यंदा विसर्जित केलेल्या शेकडो श्री गणेशमूर्ती नदीपात्रात उघड्यावर आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले होते. भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या बाप्पांच्या मूर्ती अशा अवस्थेत पडलेल्या पाहून भाविकांमध्ये नाराजी होती.

ही बाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. कोणतीही वेळ न दवडता त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात मोठा खड्डा खोदण्यात आला आणि अस्ताव्यस्त पडलेल्या सर्व गणेशमूर्ती गोळा करून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने आणि सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यात आले.

पोलिसांच्या या कृतीमुळे केवळ भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखला गेला नाही, तर नदीपात्र स्वच्छ होण्यासही मदत झाली आहे.

सामान्यतः पोलीस म्हटले की कडक शिस्त आणि कारवाई एवढेच चित्र डोळ्यासमोर येते, मात्र सामाजिक आणि धार्मिक भावनांची जपणूक करण्यासाठी चोपडा पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता यांचे चोपडावासीयांकडून जोरदार कौतुक होत असून, या कृतीमुळे पोलीस आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!