विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जामनेर शहरातील नगारखाना परिसरात ६० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या वीर भगतसिंग मित्र मंडळातर्फे यंदा साडेतीन शक्तीपीठांचा भव्य व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. आकर्षक आरास, धार्मिक देखावा आणि विविध मनोरंजक कार्यक्रमांमुळे नगारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण असून, हे कार्यक्रम विनामूल्य पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे.
विनामूल्य मनोरंजनाची पर्वणी
मंडळातर्फे नागरिकांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यात आले.
१४ ऑक्टोबर २०२६ (बुधवार) – रितेश बोरनारे
१५ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) – रितेश बोरनारे (हास्यविनोद रीलस्टार)
१७ ऑक्टोबर २०२६ (शनिवार) – जादूगराचा कार्यक्रम
१८ ऑक्टोबर २०२६ (रविवार) – खेळ रंगला पैठनीचा ( होम मिनिस्टर) – अविनाश जादूगार ( खास महिलांसाठी )
१९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) – प्रस्तावित कार्यक्रम
या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लाखोंची उधळपट्टी टाळून सामाजिक भानाचा आदर्श!
डीजे-बँडला फाटा; दुष्काळाच्या सावटात साधेपणाने विसर्जन मिरवणूक
उत्सव म्हटला की मोठा डीजे, बँड, ध्वनिक्षेपक आणि त्यावर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च, अशी वाढती प्रवृत्ती दिसून येत आहे. मात्र, या प्रवाहाला छेद देत वीर भगतसिंग मित्र मंडळाने यंदा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
राज्यात दुष्काळाचे सावट असताना केवळ दिखावा आणि क्षणिक जल्लोषासाठी लाखो रुपये खर्च करणे कितपत योग्य? हा सामाजिक प्रश्न उपस्थित करत मंडळाने डीजे-बँडवरील अनाठायी खर्चाला यंदा स्पष्टपणे फाटा दिला आहे.
‘उत्सवासाठी पैसा खर्च करायचा, पण पैशांची उधळपट्टी करायची नाही; श्रद्धा जपायची, पण समाजाप्रती असलेली जबाबदारीही विसरायची नाही,’ या विचारातून मंडळाने अत्यंत साधेपणाने विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या काळात डीजे, बँड आणि मोठ्या आवाजाच्या साधनांवर खर्च होणारा पैसा काही तासांच्या मनोरंजनापुरता मर्यादित राहतो. त्याऐवजी हा पैसा समाजोपयोगी उपक्रम, गरजूंची मदत यांच्या उपयोगात आणला तर त्यातून समाजाला दीर्घकाळ फायदा होऊ शकतो, असा संदेश मंडळाच्या निर्णयातून देण्यात आला आहे.
‘दिखाव्यापेक्षा समाजहित मोठे’
ध्वनी प्रदूषणाला आळा, अनाठायी खर्चाला लगाम आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य, अशी त्रिसूत्री जपत मंडळाने घेतलेला हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरत आहे. उत्सवाची भव्यता ही डीजेच्या आवाजात किंवा पैशांच्या उधळपट्टीत नसून, समाजाला काहीतरी सकारात्मक देण्यातच खरी भव्यता आहे, हा संदेश वीर भगतसिंग मित्र मंडळाने आपल्या कृतीतून दिला आहे.
मंडळाच्या या निर्णयाचे वरिष्ठांकडून विशेष कौतुक करण्यात येत असून, जामनेर शहरातील इतर मंडळांसाठीही हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
६० वर्षांची परंपरा जपत यंदा ‘उत्सवही आणि सामाजिक जबाबदारीही’ असा आदर्श निर्माण करणाऱ्या वीर भगतसिंग मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
