जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव – मागच्या काही दिवसांपासून जळगावकर ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने चांगलेच हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले असून, आता या उकाड्यापासून महिन्याच्या अखेरीस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमान ३८ अंशावर, दिवसा उन्हाचा चटका तर रात्री गारवा
जळगाव जिल्ह्यात यंदा सप्टेंबरच्या मध्यापासूनच पावसाने पाठ फिरवली आहे. परतीच्या पावसानेही अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. त्यातच ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा पारा थेट ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
दिवसभर कडक ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवत असताना गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या तापमानात मात्र घट झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी हलका गारवा अनुभवायला मिळत आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री सुखद वातावरण, असे संमिश्र चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
१७ ऑक्टोबरपासून वातावरणात बदल?
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे १७ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि हेच वातावरण २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान अवकाळी पावसासाठी पोषक ठरणार आहे.
मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष पावसाची स्थिती हवामानातील पुढील बदलांवर अवलंबून राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना: अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.
