जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला बस थांबा केवळ शोभेचा ठरला आहे. जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबतच नसल्याने हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता थेट बसेस अडविण्याचा इशारा दिला आहे.

विद्यापीठात जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, धरणगावसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाण्यासाठी मुख्य गेटसमोर हा थांबा मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या थांब्यावर बसेस थांबत नसल्याने त्याचा कोणताच फायदा विद्यार्थ्यांना होत नाही.

हात दाखवूनही बसेस सुसाट!

विद्यार्थ्यांनी सांगितले की, बसमध्ये जागा असतानाही चालक हात दाखवूनही बस थांबवत नाहीत आणि भरधाव वेगात निघून जातात. त्यामुळे तासन् तास थांब्यावर उभे राहावे लागते. विशेषतः सायंकाळी घरी परतताना मुला-मुलींची प्रचंड गैरसोय होते, वेळ वाया जातो आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.

अनेक विद्यार्थ्यांनी महागडे एसटी पास काढलेले आहेत. खासगी वाहन परवडत नसल्याने ते एसटीवर अवलंबून आहेत. “पास काढूनही वेळेवर बस मिळत नसेल तर या पासचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या बाबत विभाग नियंत्रकांकडे तक्रारी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

विद्यार्थ्यांची मागणी काय?

१. विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोरील थांब्यावर सर्व संबंधित मार्गावरील बसेस थांबवण्याच्या लेखी आणि स्पष्ट सूचना चालक-वाहकांना द्याव्यात.

२. जागा असतानाही मुद्दाम बस न थांबवणाऱ्या चालकांवर चौकशी करून कारवाई करावी.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक वेळ, आर्थिक अडचण आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तातडीने याची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असून आता विभाग नियंत्रक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!