वसीम भैया शेख यांचा २० तारखेनंतर संविधानिक अनोख्या आंदोलनाचा इशारा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी –
रावेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी शहरातील मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत. शहरातील मदिना कॉलनी ते मस्तान चौक आणि मटक्याच्या हॉटेलपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समाजसेवक तथा शिवसैनिक वसीम भैया शेख यांनी नगरपालिकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “नगरपालिका नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टीच्या नावाखाली ५० हजार, ६० हजार, ७० हजार रुपयांपर्यंत कर वसूल करते, मात्र सुविधांच्या नावाने शून्य कारभार सुरू आहे. कर घ्यायचा आणि सुविधा द्यायच्या नाहीत, हा कुठला न्याय?” असा संतप्त सवाल वसीम भैया शेख यांनी उपस्थित केला आहे.
ऑक्सिजन पेशंट आणि गरोदर महिलांचे हाल; अपघाताला निमंत्रण
या खराब रस्त्यावर ठिकठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बनवण्यात आलेल्या मोठ्या गतीरोधकांमुळे (Speed Breakers) नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ऑक्सिजनवर असलेल्या गंभीर रुग्णांना दवाखान्यात नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, गरोदर महिलांना या खडतर रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
त्याचबरोबर खुलफाई राशीदीन मशिदीजवळील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरीही पालिकेचा एकही कर्मचारी फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर केवळ स्वतःच्या सत्कार, हार-तुरे आणि दौऱ्यांमध्ये मग्न असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
२० तारखेपर्यंत अल्टिमेटम; नाहीतर अनोखे आंदोलन
या प्रश्नी वसीम भैया शेख यांच्या नेतृत्वाखाली एजाज भाई आणि मदिना कॉलनी, मस्तान चौक परिसरातील शेकडो नागरिक एकत्र आले होते. नगरपालिका प्रशासनाला २० तारखेपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.
यावेळी वसीम भैया शेख यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हणाले,
“माझ्या शहरातील सर्वसामान्य जनता ही माझी जबाबदारी आहे. जनतेवर अन्याय होत असेल तर मी १००% लढणारच! प्रशासनाने २० तारखेपर्यंत काम सुरू केले नाही, तर आम्ही स्वतःच्या हाताने या रस्त्याचे भूमिपूजन करू. रस्त्यावर फुले आणि पाकळ्या वाहून, हातात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन संविधानिक मार्गाने रस्त्यावर बसून अनोखे आंदोलन करू. आम्ही कोणत्याही परिणामांची चिंता करणार नाही.”
या प्रसंगी एजाज भाई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पालिका प्रशासन या इशाऱ्यानंतर जागे होते का, याकडे संपूर्ण रावेरकरांचे लक्ष लागले आहे.
