जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जळगावच्या महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी दिला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्याच्या प्रकारावरून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी आज अधिकाऱ्यांसह डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली.

ठेकेदाराची केली कानउघाडणी
पाहणीदरम्यान डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्याचे निदर्शनास आल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सूचना देत, यापुढे असा प्रकार घडल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.
त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडवरील अपूर्ण प्लॅटफॉर्म, शेडचे प्रलंबित काम, कंपाऊंड वॉल आणि इतर अपूर्ण सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही सर्व कामे तातडीने आणि दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
“नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ जळगाव हीच माझी प्राथमिकता आहे. जो कोणी आपल्या जबाबदारीत कसूर करेल, त्याच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असे महापौर काळे यांनी ठणकावून सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थानिक नगरसेविका जयश्री पाटील, उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले आणि प्रकल्प अभियंता योगेश वाणी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
