जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि आपल्या पारंपरिक कला-संस्कृतीचे जतन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात बाल रंगभूमी परिषदेमार्फत आयोजित लोककला प्रशिक्षण शिबिर मोठ्या जल्लोषात आणि विद्यार्थ्यांच्या जोरदार प्रतिसादात संपन्न झाले.

या शिबिरात खानदेशातील प्रसिद्ध लोककलेचे अभ्यासक व लोककलावंत शाहीर विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना लोककलेची महती पटवून दिली. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, उपाध्यक्ष पंकज बारी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता हर्षल पवार व त्यांचे सहकारी अवधूत दलाल, गजानन साळुंखे, शालिग्राम रेणुके, विलास दलाल यांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून शाहिरी पोवाडा, गोंधळ, भारुड, पारंपरिक लोकगीते यांचे प्रभावी सादरीकरण केले.

ढोलकी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत कलावंतांनी लोकपरंपरेचा जागर घातला. आपल्या मातीत रुजलेल्या या लोककलांचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. या उपक्रमातून लोककला, लोकपरंपरा आणि संस्कृती जतनाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. यामिनी चौधरी यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उल्हास ठाकरे, योगेश शुक्ल तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे, जगदीश साळुंखे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
