सहारा टाऊन प्रवेशद्वाराजवळ घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

इमारत बांधकाम रखवालदाराचा अज्ञाताने खून केल्याची घटना नंदुरबार शहरातील सहारा टाऊन प्रवेशद्वाराजवळ घडली असून, अज्ञाताविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे सहारा टाऊनसारख्या गजबजलेल्या वसाहतीत खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार शहरातील प्रसिद्ध अशा सहारा टाऊन प्रवेशद्वाराजवळ डायमंड सिटी येथे इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाच्या ठिकाणावर रखवालदार म्हणून खंडू ठाकरे (वय ५६, रा. टोकरतलाव, जि. नंदुरबार) हा काम पाहत होता. सहारा टाऊन गेट शेजारील प्लॉटमधील त्याच्या राहत्या झोपडीत अज्ञाताने प्रवेश करत डोक्यावर, तोंडावर, डोळ्यावर कठीण वस्तूने प्रहार करून गंभीर जखमी केले. खंडू आतऱ्या ठाकरे यास गंभीर जखमी अवस्थेत सकाळी ९.१५ वाजता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास खंडू ठाकरे यांची प्राणज्योत मालवली. खंडू ठाकरे यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर सायंकाळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने घेतले. तर श्वान पथकाने खंडू आतऱ्या ठाकरे यांच्या झोपडीपासून काही अंतरापर्यंत आरोपींचा माग दाखविला.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशितकुमार कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. विशेष म्हणजे अज्ञाताने झोपडीत शिरून खंडू आतऱ्या ठाकरे यांच्यावर कठीण वस्तूने प्रहार करीत जीवे ठार मारले आहे. सहारा टाऊनसारख्या परिसरात झालेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

लहू खंडू ठाकरे (रा. टोकर्टलाव, ता. नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!