शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुसार नियमित करण्याची मागणी; घरकुल, वीज, पाणी व रस्त्यांच्या सुविधांसाठी आंदोलन

चोपडा तालुका प्रतिनिधी, अजय परदेशी.

चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील गट क्रमांक ३० (१), ३०/२ व ३१ (१) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कुटुंबांच्या निवासी हक्कांचा प्रश्न मार्गी लावून पात्र कुटुंबांच्या अतिक्रमणांचे शासनाच्या नियमानुसार नियमितीकरण करावे, तसेच त्यांना घरकुलासह वीज, पाणी, रस्ते व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या प्रश्नासंदर्भात भीम आर्मीचे जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर यांनी गटविकास अधिकारी अंजली वर्गे व चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत. संबंधित कुटुंबे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असून, स्वतःच्या श्रमातून त्यांनी निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र, निवासासंबंधीच्या नोंदी व आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना न्याय देण्याची मागणी

संबंधित जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे स्थळपंचनामे, प्रत्यक्ष सर्वेक्षण व जमिनीची मोजणी करण्यात यावी. कुटुंबांचा वास्तव्याचा कालावधी, घरांचे अस्तित्व आणि शासनाच्या नियमानुसार पात्रता यांची महसूल प्रशासनामार्फत तपासणी करावी. तसेच ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा घेऊन आवश्यक ठराव मंजूर करावा आणि नियमितीकरणाचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीमार्फत तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या पत्रावर तसेच यापूर्वी दिलेल्या अर्जांवर आजपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा सविस्तर लेखी अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

घरकुलासह मूलभूत सुविधांचा लाभ मिळावा

पात्र कुटुंबांना नियमानुसार निवासी जागेचा हक्क मिळावा, तसेच घरकुल योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. वीज, पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे.

प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि प्रलंबित प्रश्नावर नियमानुसार ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मागण्यांवर निर्धारित कालावधीत ठोस व कायदेशीर कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित आयोगांकडे तक्रारी सादर करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

गणेश भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन

भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेशजी सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष मुबारक तडवी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, जिल्हा सचिव वैशाली पाटील हेरोळे, शारदा तायडे, मीनाताई बोरसे, अनिल पानपाटील, मुकेश कोळी, रवींद्र भिल्ल, सुनील भिल्ल, बबन तडवी यांच्यासह समस्त भिल्ल समाजबांधव सहभागी होत आहेत.

भारतीय संविधान आणि कायद्याच्या चौकटीत लढा सुरू ठेवणार

आदिवासी भिल्ल समाजातील पात्र कुटुंबांना सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित निवास, मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय संविधान व कायद्याच्या चौकटीत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी प्रश्नावर कोणती कार्यवाही करते, याकडे सनपुले ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!