जळगाव प्रतिनिधी

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सारडा विद्यालयात मेडिटेशन (ध्यान) या विषयावर विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. पालक शाळेच्या समुपदेशक सौ. श्वेता जैन यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी सौ. श्वेता जैन, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर सौ. रमा तारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. जैन यांचे स्वागत केले.

एलसीडी प्रोजेक्टर आणि स्लाईडच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना सौ. जैन यांनी ‘ध्यान म्हणजे काय?’, ‘ध्यानाचे फायदे’ आणि दैनंदिन जीवनात ध्यानाचा समावेश कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती दिली. नियमित ध्यानधारणा केल्याने एकाग्रता वाढते, भावनांवर नियंत्रण येते, मनशांती लाभते, आत्मजाणीव वाढते आणि श्वासावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी “आनापानसती ध्यान” कसे करावे याचे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करून घेतले. नियमित ध्यानामुळे मन एकाग्र होऊन आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते, असा बहुमोल संदेश त्यांनी दिला.

या कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यामिनी चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. मनिषा पवार यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे, श्री. हिम्मत काळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!