जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा सचिव रवींद्र अहिरे यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार; नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक भंगाळे यांचाही उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान

भोपाल : भारत सरकारच्या विधी व न्याय तसेच कंपनी मंत्रालयाची मान्यता प्राप्त अखिल भारतीय ग्राहक उत्थान संघटनेचे (ALL INDIA CONSUMER PROTECTION ORGANIZATION) २६ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातील भोपाल येथील मानस भवन येथे उत्साहात पार पडले. या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील ग्राहक संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती सुशील कुमार पालो यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी न्यायमूर्ती अंजली पालो, मध्य प्रदेश शासनाचे माजी मंत्री पी. सी. शर्मा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जितेंद्र ऊर्फ जीतू पटवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार रजनीश सिंह, माजी आमदार सुखेंद्र सिंह बन्ना, मध्य प्रदेश सेवादलाचे मुख्य संघटक अवनीश भार्गव आणि संघटनेचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब पांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

ग्राहक संरक्षण क्षेत्रात देशभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि महिला पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार निवडीसाठी ओम भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली अजय चौधरी, चितरंजन पर्वत, राजेंद्र सिंह बसवाल आणि शिवाकामी एस. यांचा समावेश असलेली पाच सदस्यीय निवड समिती गठित करण्यात आली होती.

राष्ट्रीय स्तरावरील राज्यनिहाय पुरस्कारांमध्ये छत्तीसगड प्रदेशाला प्रथम, पंजाब प्रदेशाला द्वितीय, तर तमिळनाडू प्रदेशाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष संदीप सूरी, दिल्लीचे श्रीधर अय्यर, आंध्र प्रदेशचे कटरा गड्डा, तमिळनाडूचे डॉ. शिवकुमार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड, छत्तीसगडचे खुलेश वर्मा, केरळचे अब्दुलकरीम खान, पंजाबचे बलबीर सिंह, कर्नाटकचे योगेश रेड्डी, हरियाणाचे देवेंद्र अत्री, झारखंडचे देवकुमार द्विवेदी आणि मुंबई, महाराष्ट्रातील विंचूर यांच्यासह विविध प्रदेशांतील पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

महिला पदाधिकाऱ्यांचाही सन्मान

महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कटनी येथील प्रीती सेन यांना प्रथम, झारखंडच्या पुष्पा मिश्रा यांना द्वितीय, तर महाराष्ट्राच्या मंगला गरडे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार

या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक भंगाळे यांना यावर्षीचा उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जळगाव जिल्ह्याचे सचिव रवींद्र अहिरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

देशभरातील ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत पदाधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे हे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनामुळे ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि ग्राहक संरक्षणाच्या कार्याला अधिक बळ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!