नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नंदुरबार शहरातील नामांकित असलेल्या डी-मार्ट स्टोअरमध्ये निकृष्ट दर्जाच्या नारळांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या नारळाच्या साठ्यातील एक नारळ आतून पूर्णपणे सडलेला, रंग बदललेला आणि कीड लागल्याचे स्पष्ट दिसत असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ग्राहक मोठ्या विश्वासाने ब्रँडेड स्टोअरमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जातात. मात्र अशा नामांकित स्टोअरमध्येच जर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड होत असेल तर ही गंभीर बाब आहे. सडका नारळ खाल्ल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच ग्राहकांची आर्थिक फसवणूकही होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

नारळ खरेदी केल्यानंतर आतून खराब निघाला तर ग्राहकांचे पैसे वाया जातातच, पण अन्न सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे डी-मार्ट व्यवस्थापनाकडून येणाऱ्या मालाची खरेदी, साठवणूक आणि विक्रीपूर्व गुणवत्ता तपासणी नेमकी कशी केली जाते? खराब माल वेळीच बाजूला का काढला जात नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत.

FDA ने तातडीने लक्ष घालावे – नागरिकांची मागणी

या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने दखल घ्यावी. नंदुरबार डी-मार्टमधील नारळाच्या संपूर्ण साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून प्रयोगशाळा तपासणी करावी. जर साठ्यात खराब आणि विक्रीस अयोग्य नारळ आढळले तर ते तात्काळ विक्रीतून हटवून संबंधित स्टोअर आणि पुरवठादारावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबारकर नागरिक करत आहेत.

ग्राहक पैसे मोजून वस्तू घेतो तेव्हा त्याला सुरक्षित आणि दर्जेदार वस्तू मिळालीच पाहिजे. ही केवळ एका नारळाची बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे प्रशासन या व्हिडिओची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करणार का? याकडे संपूर्ण नंदुरबारचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!