जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना जिल्ह्यात उद्भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या उच्चस्तरीय पथकाने बदनापूर आणि अंबड तालुक्यातील विविध गावांमधील शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
यावेळी पिके करपून गेल्याचे विदारक चित्र पथकाला पाहायला मिळाले. पथकाने केवळ पाहणी न करता, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, पाणी टंचाई आणि पिकांचे झालेले नुकसान याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली.
पथकात या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
या केंद्रीय पथकामध्ये
१. महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे
२. नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग
३. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.
उच्चस्तरीय उपस्थिती
या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार नारायण कुचे, राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणीनंतर हे केंद्रीय पथक आपला सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असून, त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी दुष्काळी मदत आणि विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
