जलकवच अभियान युद्धपातळीवर राबवा, ‘विकसित ग्रामपंचायत प्लॅन’ तयार करा
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
जालना / घनसावंगी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना त्यांच्याच गावात तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज रोजगार हमी, जलसंधारण आणि इतर विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कणगरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) सुरेश टेंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कपसे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जलकवच अभियानावर भर
‘शेल्फ ऑफ प्रोजेक्ट्स’ तयार ठेवून जलसंधारण व मृदसंधारणाची जास्तीत जास्त कामे हाती घ्यावीत. जालना-जलकवच अभियानांतर्गत जलतारा, शोषखड्डे, छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, गाळ काढणे तसेच इतर जलसंधारण व मृदसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करावीत. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत चारा लागवडीची कामे घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
‘विकसित ग्रामपंचायत प्लॅन’ तयार करण्याचे आदेश
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अनुज्ञेय 375 कामांची माहिती नागरिकांसमोर प्रदर्शित करून व्हीडीजीपी (विकसित ग्रामपंचायत प्लॅन) आराखडा तयार करण्यात यावा.
कामांना प्राधान्य क्रम ठरविताना महिला, भूमिहीन मजूर, अल्पभूधारक आणि संवेदनशील वस्तीतील नागरिकांचा सहभाग प्राधान्याने घ्यावा, असेही जिल्हाधिकारी मित्तल यांनी स्पष्ट केले.
