लोणी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल लंपास ; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जामनेर – शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विद्युत केबल चोरणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, ७० हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी, ता. जामनेर येथील शेतकरी गोपाळ प्रल्हाद कोल्हे यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यावरून ५ ऑक्टोबर २०२६ रोजी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग आला. फत्तेपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तोंडापूर येथून चौघांना ताब्यात

गणेश नारायण कोळी (वय २४),

शाहरुख अजित तडवी (वय २८),

प्रवीण धनराज गवळी उर्फ कोळी (वय २५)

विकास गजानन जाधव (वय १९),

सर्व रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव. या सर्वांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार दुकानदाराचा शोध घेण्यात आला.

या प्रकरणात भंगार व्यावसायिक राजीक खान लाड खान (वय ३०, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत दोन लोखंडी कटर – किंमत १०० रु., सुमारे ५ किलो तांबे – किंमत ५ हजार रु., केबलमधील ४५ किलो तांबे – किंमत ४५ हजार रु. आणि एमएच १९ ईएन ०८९३ क्रमांकाची हिरो कंपनीची मोटारसायकल – किंमत २० हजार रु. असा एकूण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेतातील विद्युत केबल, मोटारपंप चोरीमुळे सिंचन ठप्प होऊन शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते. त्यामुळे नागरिकांनी अशा चोऱ्यांबाबत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि संशयास्पद भंगार व्यवहारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!