विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

रांजणगाव एमआयडीसीतील शासकीय भट्टीत नियमानुसार विल्हेवाट; संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण

जळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट केला आहे. ९ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे ही प्रक्रिया पार पडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या अँम्फेटामाइन आणि मेथाक्वालोन या पदार्थांचे एकूण वजन ४६ किलो १५४ ग्रॅम इतके होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या आदेशानुसार ही विल्हेवाट लावण्यात आली.

या कारवाईसाठी विशेष प्रक्रिया राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षातील साठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. समितीने मान्यता दिल्यानंतर ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून सीलबंद मुद्देमाल पंचांसमक्ष बाहेर काढण्यात आला.

सुरक्षित वाहतुकीसाठी सशस्त्र पोलीस गार्डचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मुद्देमाल रांजणगाव एमआयडीसी येथील मे. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., प्लॉट नं. ५६, ता. शिरूर येथे नेऊन वैज्ञानिक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आला. पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या देखरेखीखाली हा नाश करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय गायकवाड, निरीक्षक राहुल गायकवाड, वजने-मापे निरीक्षक गौतम बावस्कर, पंच सुनील विसावे, संजय रंधे आदी उपस्थित होते.

या मोहिमेत उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, राहुल बैसाणे, सागर पाटील, उमाकांत पाटील, नाईक शैलेंद्र पाटील, कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे, आशुतोष सोनवणे, केतन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. शासकीय छायाचित्रकार जयंत चौधरी यांनी चित्रीकरण केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!