जळगाव प्रतिनिधी, महेश माळी

टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या विद्यार्थी पिढीला सर्जनशील वाटेवर आणण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात एक आगळीवेगळी कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात “टी.व्ही. मोबाईलच्या पलीकडचे जग – स्क्रीन टाइम ते स्किल टाइम” या विषयावर कुतूहल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध समुपदेशक श्री. महेश गोरडे यांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख व्याख्याते श्री. महेश गोरडे, प्रा. दिलीप भारंबे, नाट्यकलाकार श्री. योगेश शुक्ल, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, सौ. प्राजक्ता गोहिल यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मोबाईलच्या दुष्परिणामांवर प्रबोधन, खेळातून विज्ञानाचे धडे

यावेळी समुपदेशक महेश गोरडे यांनी टीव्ही, मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापरामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्या आणि दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले.

फक्त भाषण नाही तर कृतीतून शिक्षण देत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणारे शैक्षणिक साहित्य, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवणारे आणि विविध कौशल्य विकसित करणारे खेळ सादर केले. विज्ञानातील कठीण संकल्पना त्यांनी खेळाच्या माध्यमातून सोप्या करून सांगितल्या.

विद्यार्थ्यांचे दोन गट करून त्यांच्यात चुरशीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. एका विद्यार्थ्याला दक्षिण आफ्रिकेतील ‘आदिवासी लोकांचा राजा’ बनवून त्यांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले, ज्यामुळे सर्व विद्यार्थी जिंकण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले.

मुलांना अशा मनोरंजक आणि ज्ञानात्मक खेळांमध्ये व्यस्त ठेवल्यास मोबाईल, टीव्हीची आठवणही येणार नाही, हे त्यांनी कृतीतून पटवून दिले आणि आपला बहुमोल वेळ ज्ञानवर्धक कामासाठी वापरण्याचे आवाहन केले.

वाचन अभियानावर मार्गदर्शन

या कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी प्रा. दिलीप भारंबे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच बालरंगभूमीचे अध्यक्ष व नाट्यदिग्दर्शक श्री. योगेश शुक्ल यांनी ‘वाचन अभियाना’बाबत मार्गदर्शन करत आवाजात चढ-उतार कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता करे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. प्राजक्ता गोहिल यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. उल्हास ठाकरे, श्री. सोमनाथ महाजन, श्री. दीपक पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!