रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे थॅलेसेमियामुक्तीसाठी जागृती व्याख्यानाचे आयोजन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा, भारतीय समाजात विवाहापूर्वी कुंडलीनुसार ३६ गुण जुळवून वधू-वरांची जोडी निश्चित केली जाते. आता मात्र विवाहापूर्वी दोघांची थॅलेसेमिया चाचणी करून दोघेही थॅलेसेमिया मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी हा चाचणीचा ३७ वा गुण जुळवावा, असे आवाहन थॅलेसेमियामुक्त भारतासाठी प्रयत्नशील विशेषज्ञ रोटे. डॉ. सई नेमाडे (जळगाव) यांनी केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या थॅलेसेमिया निर्मूलन प्रकल्पाच्या प्रमुख तथा कोसला फाउंडेशनच्या डॉ. सई नेमाडे यांनी रोटरी क्लब ऑफ चोपडा व सौ. शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आयोजित थॅलेसेमिया जागृती प्रकल्पांतर्गत फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
डॉ. नेमाडे यांनी सांगितले की, कुटुंबातील जनुकीय वारसा आणि नात्यातील लग्न ही थॅलेसेमिया होण्याची प्रमुख कारणे आहेत. जळगाव जिल्ह्यातील काही जातीसमूहांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते. थॅलेसेमियाचे मेजर आणि मायनर असे दोन प्रकार आहेत. थॅलेसेमिया असणाऱ्या पालकांची अपत्ये धोकादायक जीवन जगतात. अशा रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते. अपुरा रक्तसाठा, रक्ताद्वारे इतर आजारांचे संक्रमण, रक्तातील लोहाचे प्रमाण वाढणे आणि ग्रामीण भागात रक्त देण्याची सोय उपलब्ध नसणे यासारखी आव्हाने त्यांच्यासमोर असतात.

या आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉ. नेमाडे यांनी खालील उपाय सुचविले :
– विवाहापूर्वी वधू-वरांची थॅलेसेमिया चाचणी करणे
– सुदृढ व्यक्तींनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करणे
– नात्यातील लग्न टाळणे
– रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणे
– थॅलेसेमिया रुग्ण दत्तक घेणे
– व्यापक प्रमाणात जनजागृती करणे
– विवाहापूर्वी, गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात आवश्यक तपासणी करणे
‘थॅलेसेमिया निर्मूलन’ हा रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चा विशेष सेवा प्रकल्प असून या अंतर्गत जनजागृती आणि रुग्णांची तपासणी यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. गौतम वडनेरे यांनी केले. आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. संजय बारी व कुंदन पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रुपाली पाटील यांनी केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. संजय बारी, मानद सचिव लीना पाटील, अति. जिल्हा सचिव नितीन अहिरराव, प्रकल्प प्रमुख डॉ. वैभव पाटील, सहप्रकल्प प्रमुख डॉ. विशाखा अग्रवाल, डॉ. नीता जैस्वाल, विलास पी. पाटील, वसंत नागपुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. भरत जैन, डॉ. मोहम्मद रागिब, डॉ. संदीप पवार, डॉ. भूषण पाटील, डॉ. रोहित पाटील, रवींद्र श्रावणे, राम पाटील, राहुल कुवर, कृष्णल पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
