नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना अगदी कमी खर्चात आणि सुरक्षितपणे जाता येणार आहे.
नंदुरबार आगारप्रमुख सुनील महाले यांनी तालुक्यातील आणि शहरातील भाविकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये काय?
१. ४० प्रवाशांचा ग्रुप: या योजनेसाठी किमान ४० प्रवाशांचा ग्रुप तयार करावा लागतो. तुम्ही तुमच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार किंवा गावातील लोकांसोबत मिळून हा ग्रुप तयार करून एकत्रित तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता.
२. देशभरात कुठेही जा: या योजनेत फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांना देखील भेट देता येते.
३. महिलांना अर्धे तिकीट: एसटीच्या नियमानुसार महिलांना या तीर्थयात्रेत ५० टक्के तिकीट सवलत मिळणार आहे.
४. ज्येष्ठांना मोफत प्रवास: ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना देणे आणि सामान्य भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या दरात तीर्थदर्शन घडवणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील भाविकांनी आपले ग्रुप तयार करून त्वरित नोंदणी करावी. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी नंदुरबार एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगारप्रमुख महाले यांनी केले आहे.
