जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे एक अभिनव शैक्षणिक पर्व सुरू झाले आहे. ‘पाठांतरातून प्रगती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्याचा निर्धार शाळेने केला आहे.

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील २५० विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी विशेष वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

काय आहे उपक्रम?

‘दररोज थोडे पाठांतर, अभ्यासात मोठी भरारी!’ हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी कविता, पाढे, श्लोक, सुविचार, प्रश्नोत्तरे, व्याख्या आणि विविध विषयांतील महत्त्वाची माहिती दररोज पाठ करून वर्गासमोर आत्मविश्वासाने सादर करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

केवळ परीक्षेपुरते पाठांतर मर्यादित न ठेवता, त्याला व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन बनवणे हा यामागचा हेतू आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची गोडी, प्रभावी सादरीकरण कौशल्य आणि आकलनशक्ती विकसित होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलेल्या ‘पाठांतर वही’मध्ये दररोजच्या पाठांतराची नोंद ठेवली जाणार असून, शिक्षकांकडून त्याची नियमित तपासणी केली जाणार आहे. उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहनही दिले जाणार आहे.

या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी केले असून मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी २५० वह्या उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून, ‘पाठांतराची सवय – अभ्यासाची गती – प्रगतीची नवी दिशा’ हा संस्कार रुजवण्याचा शाळेचा मानस या उपक्रमातून सफल होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!