नाशिक जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि डोंगराळ भाग असलेल्या सुरगाणा व पेठ तालुक्यांत सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार आणि शनिवारी जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी, संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. भूगर्भातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने चार संवेदनशील ठिकाणी आधुनिक ‘सिस्मोमीटर’ (भूकंपमापक यंत्रे) कार्यान्वित करून २४ तास निरीक्षण सुरू केले आहे.
सिस्मिक झोन ३ मुळे प्रशासन अलर्ट मोडवर
नाशिक जिल्ह्याचा समावेश भूगर्भीय रचनेनुसार ‘सिस्मिक झोन ३’ (मध्यम धोका असलेला विभाग) मध्ये होतो. त्यामुळे अशा वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. बसवण्यात आलेल्या चारही सिस्मोमीटर यंत्रांद्वारे भूगर्भातील सूक्ष्म लहरी, वारंवारता आणि केंद्रबिंदू यांवर २४ तास थेट नजर ठेवली जात आहे.
नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन
हे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जुन्या व कमकुवत घरांमध्ये झोपणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक तहसील व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून तज्ज्ञांची चमू भूगर्भातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
