विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पाळधी ता. धरणगाव बसस्थानकात प्रवासी बसमध्ये चढत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पाळधीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव राजनंदिनी श्रीराम शिंदे (वय १४, रा. सावदा, ता. एरंडोल) असे आहे. ती पाळधी येथील स. नं. झंवर विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राजनंदिनी बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. जळगावहून रवंजाकडे जाणारी बस (क्रमांक एमएच ४० एन ९६४१) स्थानकात येताच ती त्यात चढण्यासाठी गेली. गर्दीत चढत असताना अचानक तिचा तोल बिघडला आणि ती थेट रस्त्यावर कोसळली. ती सावरायच्या आतच बसच्या मागील चाकाखाली ती सापडली.

या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. तिला तातडीने शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

पोलिसांनी बस केली जप्त

घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेने बसस्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

एका हुशार आणि होतकरू विद्यार्थिनीचा अशा दुर्दैवी अपघातात बळी गेल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!