शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पाणी-चारा टंचाई आणि पीक नुकसानीवर सरकारचा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कमी पर्जन्यमान आणि वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, जळगाव, बोदवड आणि भडगाव या सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे.
काय मिळणार मदत?
पाणी टंचाईवर उपाय: टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि विहिरींच्या अधिग्रहणाचे आदेश.
चारा टंचाई: जनावरांसाठी शासनाकडून चारा छावण्या सुरू केल्या जाणार.
पीक नुकसान भरपाई: ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने मदत दिली जाणार.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिवाळी सणापूर्वी जिल्ह्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्याचे नियोजन आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीपूर्वी मदत मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच सविस्तर शासन निर्णय (GR) प्रसिद्ध होणार आहे.
