विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जळगाव : प्रतिनिधी – घरात आजोबांच्या श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ललित मनोहर झंवर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना पाळधी-तरसोद बायपास रस्त्यावरील टहाकळी फाट्याजवळ घडली. ललित हे आपल्या दुचाकीने बहिणीला आणण्यासाठी जळगावकडे जात होते. ते पाळधी रेल्वे पुलाजवळ आले असता, त्याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात अवजड वाहनाचे अचानक टायर फुटले व त्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेल्या वाहनाने ललित यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की ललित दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही हात-पाय फ्रॅक्चर झाले होते.
त्याच वेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने त्यांना रुग्णवाहिकेत घेतले आणि जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
नवरात्रात लग्नाची तयारी, कुटुंबावर दुःखाचा डोंगर….
ललित यांच्या अकाली जाण्याने झंवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आगामी नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर ललित यांच्या लग्नाची तयारी कुटुंबीयांनी सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच या अपघाताने सर्व आनंद हिरावून घेतला आहे.
दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास मार्ग अत्यंत अपघातप्रवण बनला असून गेल्या दोन महिन्यांत या मार्गावर आठ जणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
