जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
शेठ ला.ना.सा. विद्यालयात “ध्यानधारणा” कार्यशाळा उत्साहात संपन्न; सौ. भावना चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये मानसिक एकाग्रता वाढावी आणि अभ्यासात प्रगती व्हावी या उद्देशाने जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात “ध्यानधारणा” या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त रेकी मास्टर सौ. भावना चव्हाण या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी सौ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा म्हणजे काय?, ध्यानाचे प्रकार कोणते?, त्याचे शारीरिक व मानसिक फायदे काय? याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. केवळ मार्गदर्शन न करता त्यांनी विद्यार्थ्यांकडून वर्गातच सामूहिक ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेतले. नियमित ध्यान केल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासातील एकाग्रता वाढते, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे होते. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, श्री. मुकेश चव्हाण यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होता. 
याच कार्यक्रमात “भारत को जानो” या उपक्रमात बक्षीस प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली पाटील व श्रीमती योगिता महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रुपाली महाजन यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
