घनसावंगी पंचायत समितीत दुर्दैवी घटना!

घनसावंगी, जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बांधकाम सुरू असताना अचानक लोखंडी खांब / कॉलम थेट मजुराच्या अंगावर कोसळल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत मजुराचे नाव आनंद अशोक भरपुर (वय ३३, रा. रूई, ता. अंबड, जि. जालना) असे आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू होते. त्यावेळी आनंद भरपुर हे काम करत होते. अचानक वजनदार खांबाचा कॉलम त्यांच्या अंगावर कोसळला. कॉलम अंगावर पडताच आनंद हे त्याखाली दबले गेले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेत कॉलम बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र कॉलमचे वजन जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, घनसावंगी येथे हलविला.

या घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!