जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरुणमधील छत्रपती शिवाजी उद्यान परिसरातील घटना; मक्तेदाराच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान उघडी ठेवण्यात आलेल्या गटारीत दुचाकी आदळून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवल अर्जुन सोनवणे (रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ते व गटारीचे काम करणाऱ्या मक्तेदाराने सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नवल सोनवणे हे मेहरुण परिसरातील काम आटोपून दुचाकीवरून आपल्या घरी परतत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात नव्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यालगतच्या गटारीचे काम पूर्ण झाले नसल्याने ती उघडीच होती. गटारीच्या ठिकाणी दुचाकीस्वारांना सावध करणारे फलक, बॅरिकेडिंग किंवा अन्य कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दुपारच्या वेळी नवल हे दुचाकीवरून या मार्गाने जात असताना अचानक त्यांची दुचाकी उघड्या गटारीच्या बांधकामाच्या भागात अडकली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रस्त्याचे काम सुरू असताना धोकादायक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित ठिकाणी गटार उघडे ठेवण्यात आले असून, त्याभोवती सुरक्षात्मक अडथळे किंवा स्पष्ट सूचना देणारे फलक नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. योग्य बॅरिकेडिंग अथवा सूचना फलक लावण्यात आला असता, तर हा अपघात टाळता आला असता, असा दावा त्यांनी केला.

नवल सोनवणे हे एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे. गेल्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मोठ्या प्रमाणात नवल यांच्यावर होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करून रस्ते व गटारीच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करावी, तसेच संबंधित मक्तेदाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवल यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!