मागील हंगामातील ५०० रुपयांचे अंतिम वाढबिल तात्काळ द्या, २०२४-२५ चे ३३ रुपये थकीत बिलही द्या – शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या
जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
येणाऱ्या गळीत हंगामामध्ये उसाला पाच हजार रुपये प्रति टन दर मिळाल्याशिवाय गळीत हंगाम सुरु करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
सालुंखेड येथील श्रद्धा एनर्जी अर्थात माँ बागेश्वरी साखर कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन ५०० रुपये अंतिम वाढीव भाव, तसेच आगामी हंगामासाठी ५ हजार रुपये प्रति टन दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरु करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या :
१. मागील हंगामातील उसाला ५०० रुपये प्रति टन अंतिम वाढबिल दिले द्यावे.
२. २०२४-२५ हंगामातील प्रति टन ३३ रुपये एफआरपीची थकीत रक्कम तातडीने अदा करावी.
३. आगामी गळीत हंगामासाठी ५ हजार रुपये प्रति टन दर जाहीर करावा.
खर्च वाढला, योग्य मोबदला द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या साखरेला किमती दर मिळत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. ऊस उत्पादनासाठी वाढलेला खत, औषधे, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत उसाला योग्य मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे.
मागील हंगामातील थकीत रक्कम रखडवून ठेवून आगामी हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन
शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नाबाबत कारखाना प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील काळात आंदोलनाची भूमिका घेईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सतीश निर्मळ, नामदेव डोके, गणेश राजबिंडे, भरत काळे, बाळासाहेब बिडवे, श्रीकृष्ण निर्मळ, लक्ष्मण गव्हाणे, धोंडिबा गव्हाणे, भाऊराव काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
