जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
शहरातील छोट्या व्यापाऱ्यांवरील निवडक अतिक्रमण कारवाई थांबवावी, मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवरील अतिक्रमणांवरही समान निकषाने कारवाई करावी, पार्किंगच्या जागेतील बेकायदा दुकाने हटवावीत आणि शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव महानगरपालिका इमारतीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मनसेने यापूर्वीही लघुव्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. आईस्क्रीम गाड्या, पाणीपुरी विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मनसेने केला.
‘गरीबाची हातगाडी दिसते; मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?’
अतिक्रमणविरोधी कारवाईला मनसेचा विरोध नसून कारवाई सर्वांसाठी समान असावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. छोट्या व्यापाऱ्यांची हातगाडी किंवा भाजीची टोपली अतिक्रमण ठरत असेल, तर मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी पदपथ व सार्वजनिक जागांवर केलेले अतिक्रमणही त्याच निकषाने हटवले पाहिजे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
पार्किंगच्या जागेतील दुकाने हटविण्याची मागणी
शहरातील काही व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी राखीव जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा मुद्दाही मनसेने उपस्थित केला. पार्किंगची जागा दुकाने अथवा इतर व्यवसायांसाठी वापरली जात असल्यास ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पार्किंगच्या जागेचा शहरव्यापी सर्वे करून बेकायदा बांधकामे व दुकाने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचे मनसेने म्हटले. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होण्यासोबतच अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि निकृष्ट कामांसाठी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.
‘शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करा’
जळगावकरांना केवळ कागदावरील विकास नको, तर प्रत्यक्ष मूलभूत सुविधा हव्या आहेत, अशी भूमिका मनसेने मांडली. चांगले रस्ते, मोकळे पदपथ, पुरेशी पार्किंग व्यवस्था, स्वच्छ परिसर आणि अतिक्रमणमुक्त सार्वजनिक जागा यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
आयुक्तांना निवेदन; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलनानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. छोट्या व्यापाऱ्यांवरील निवडक कारवाई थांबवणे, पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, मोठ्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करणे, पार्किंगच्या जागेतील बेकायदा दुकाने हटवणे, पदपथ मोकळे करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, प्रदीप पाटील, योगेश पाटील, युसुफ खाटीक, राहुल चव्हाण, आली खाटीक, साजन पाटील, राजेश मराठे, विलास सोनार, खुशाल ठाकूर, दीपक राठोड यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
