जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
कुसुंबा येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रवींद्र युवराज सोनवणे (वय ४५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका कंपनीत कामाला होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रवींद्र सोनवणे यांच्या पत्नी कामावर गेल्या होत्या. घरात कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी परतला असता त्याला वडील मृतावस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्याने तातडीने शेजारील नागरिकांना याबाबत माहिती दिली.
नागरिकांच्या मदतीने रवींद्र सोनवणे यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोज घुले करीत आहेत. रवींद्र सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस तपासातून आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
