जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
शेठ ला.ना. सा. विद्यालयात शालेय परिवहन समितीची सभा उत्साहात; रिक्षा-व्हॅन चालकांचा मोठा सहभाग
जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा. विद्यालयात शालेय परिवहन समितीची सभा बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेला रिक्षा व व्हॅन चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, वाहनांची कागदपत्रे, वाहतूक नियम आणि चालकांची जबाबदारी याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी सहायक मोटर वाहन निरीक्षक सौ. अश्विनी जोगदंड, ट्रॅफिक हवालदार श्री. अमोल घुगे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ सपकाळे, मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे व श्री. जगदीश साळुंखे यांच्या उपस्थितीत विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे यांनी प्रास्ताविकातून शालेय परिवहन समितीचे महत्त्व स्पष्ट केले. सहायक मोटर वाहन निरीक्षक सौ. अश्विनी जोगदंड यांनी वाहनचालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. वाहनाची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, परिवहन ॲपचा योग्य वापर करणे, वाहनाच्या क्षमतेनुसारच विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, दररोज विद्यार्थ्यांची हजेरी घेणे तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तरांसाठी वाहनात पुरेशी जागा ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनचालकांनी स्वतःची व वाहनाची नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्लाही दिला.

ट्रॅफिक हवालदार तथा शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अमोल घुगे यांनी शासनाने निर्धारित केलेल्या वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. चालकांनी वाहन चालविताना लायसन्स, विमा व फिटनेस प्रमाणपत्र सोबत ठेवावे, वाहनाला आवश्यक ठिकाणी जाळ्या व सुरक्षित दरवाजे बसवावेत आणि व्यसनमुक्त राहून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ सपकाळे यांनीही चालकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याबरोबरच स्व. आनंद दिघे कल्याणकारी महामंडळाचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व नियमबद्ध पद्धतीने करण्यासोबतच योग्य भाडेवाढीबाबत पालकांना पूर्वसूचना देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

सभेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी वाहनचालकांनी मांडलेल्या योग्य सूचनांचा विचार करून त्यांना शाळेकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसोबतच शाळा, पालक आणि वाहनचालक यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. बापू पाटील यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गशिक्षक, पालक, वाहनचालक, परिवहन विभाग तसेच श्री. दीपक पाटील, श्री. बापू पाटील, श्री. योगेश सोनजे, श्री. प्रणिल येवले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
