जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर, तसेच त्यापासून होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, झोपेच्या सवयींवर परिणाम होणे, मैदानी खेळ व शारीरिक हालचाली कमी होणे, अभ्यासातील एकाग्रता कमी होणे तसेच प्रत्यक्ष संवादावर परिणाम होणे याबाबत सोप्या उदाहरणांतून माहिती देण्यात आली. मोबाईलवर सतत गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे किंवा अनावश्यक वेळ घालविण्याऐवजी पुस्तक वाचन, चित्रकला, मैदानी खेळ, कुटुंबीयांशी संवाद आणि विविध सर्जनशील उपक्रमांना वेळ देण्याचे आवाहन करण्यात आले.

लहान वयात मोबाईलची सवय लागण्यापेक्षा ‘मोबाईलचा वापर करा, पण मोबाईलला स्वतःवर राज्य करू देऊ नका’ हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही मोबाईलच्या योग्य वापराबाबत विविध प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला.
आनंददायी शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या विषयांबाबत जागरूक करण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम पालक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी नियोजन केले.
