किनगाव-मालोद परिसरात रंगेहात चौघे जेरबंद; तपासात आणखी सात संशयित ताब्यात — एकूण ११ जण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार.

यावल : तालुक्यातील किनगाव आणि मालोद परिसरातील शेतशिवारातून महावितरणच्या विद्युत तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरी केलेल्या विद्युत तारांची विल्हेवाट लावण्यासाठी त्या तारांचा भंगार व्यावसायिकासोबत व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू असताना शेतकरी व नागरिकांनी चार जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुपडू हमजान तडवी, करीम नशीर तडवी, अलाउद्दीन मजीद तडवी तसेच किनगाव येथील भंगार व्यावसायिक आरिफ युसुफ मन्यार या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विद्युत तारांचे तुकडे, गठ्ठे तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले.

पोलिसांच्या चौकशीत महावितरणच्या लघुदाब, ११ केव्ही आणि ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत तारांची कटिंग करून चोरी केल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच परिसरात शोधमोहीम राबवली. या कारवाईत आणखी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात एकूण ११ संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.

या प्रकरणी साकळी येथील अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तार चोरीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून, चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!