अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ समर्थ भक्त डॉ. विजय लाड यांच्या हस्ते लोकार्पण; तरुण पिढीसाठी अध्यात्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनोखा सेतू
पुणे प्रतिनिधी
दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या तंत्रज्ञान शाखेतील टीमने समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर आधारित ‘मनोबोध’ या ग्रंथाच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या ‘मनोबोध एआय’ या अभिनव ॲपचे अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर थाटात लोकार्पण करण्यात आले.
ज्येष्ठ समर्थ भक्त तथा श्री सुंदरमठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांच्या हस्ते ऑनलाइन आयोजित कार्यक्रमात या ॲपचे लोकार्पण झाले. या सोहळ्यास समर्थ रामदास स्वामींच्या विविध मठांचे मठपती तसेच समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, चिंतक आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातील आनंद जोगळेकर, त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी मनाच्या श्लोकांमधील विचार व जीवनदृष्टी सर्वसामान्यांना, विशेषतः तरुण पिढीला सहज समजावी, या उद्देशाने ‘मनोबोध एआय’ ॲप विकसित केले आहे.
जीवनातील प्रश्नांना मनाच्या श्लोकांतून मार्गदर्शन
मानवी जीवनातील ताण-तणाव, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी तसेच वैचारिक प्रश्नांवर मनाच्या श्लोकांमध्ये दडलेले मार्गदर्शन शोधण्याचा प्रयत्न या ॲपच्या माध्यमातून केला जातो. वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नानुसार संबंधित ओव्या शोधून त्यांचा सार व भावार्थ समोर ठेवण्याची सुविधा ॲपमध्ये आहे.
विशेष म्हणजे मराठी तसेच इंग्रजी भाषेत विचारलेल्या प्रश्नांना काही क्षणांत संबंधित ओव्या आणि त्यांचा भावार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आणि त्यातील जीवनोपयोगी विचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. विजय लाड यांनी अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा संगम अध्यात्मिक क्षेत्रातील क्रांतिकारी घटना असल्याचे प्रतिपादन केले.
या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वृंदा जोगळेकर, अमेय महाबळेश्वरकर, सौ. मुग्धा महाबळेश्वरकर आणि अपर्णा वांगीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
