जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात पाच दिवसीय श्री गणेशोत्सवाची विविध पर्यावरणपूरक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात सांगता झाली. या गणेशोत्सवात तब्बल ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले.

श्री गणेश चतुर्थीनिमित्त कलाशिक्षक प्रेम सारस्वत यांनी स्वहस्ते तयार केलेल्या शाडू मातीच्या श्री गणरायांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणुकीद्वारे भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

मिरवणुकीत झांज पथक, लेझीम पथक, झेंडा पथक आणि एनसीसी पथकाने पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रंगीबेरंगी कागदापासून पताका तयार करणे, पर्यावरणपूरक हार बनविणे, संगणकावर श्री गणरायांची प्रतिमा साकारणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर स्लाइड शो सादर करणे, ‘माझा बाप्पा-माझी पर्यावरणपूरक आरास’, एका मिनिटात जास्तीत जास्त गणपतीची नावे सांगणे, गणपती स्तोत्र पठण, गणपतीची गाणी, चित्रकला व रंगभरण, विविध प्रकारचे मोदक तयार करणे, ५६ भोगांचा नैवेद्य, मेहंदी रेखाटन आणि आकर्षक कागदी पुष्पगुच्छ तयार करणे आदी उपक्रमांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांमध्ये सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्जनशीलता, समन्वय, गायन, वादन, नृत्य, भक्ती, शिस्त आणि स्वच्छता यांसह विविध कलागुणांचे दर्शन घडविले.

दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणरायांचे विसर्जन करण्यात आले. शाडू मातीच्या मूर्तीचे मोठ्या टबमध्ये पाणी व फुले ठेवून विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शालेय पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणेशोत्सवातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शालेय पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!