जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या नवीन मोंढा भागातील किराणा दुकानफोडीचा छडा लावण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रा कापून गल्ल्यातील सुमारे १४ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
विशाल विष्णू वाडेकर (रा. जमवाडी, ता. जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान फिर्यादी किसनलाल मुलचंदजी भाकड (वय ६४) यांच्या नवीन मोंढा परिसरातील होलसेल किराणा दुकानात चोरी झाली. चोरट्याने दुकानाचे कुलूप न तोडता थेट छतावरील लोखंडी पत्रा कटरच्या साहाय्याने कापला आणि आत प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम लंपास केली.
या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचा शोध घेतला आणि विशाल वाडेकर याला जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईमुळे नवीन मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रकरणाचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करीत आहेत.
